Thursday, February 2, 2012

कल्हईवाला

आज ब-याच वर्षांनी एका कल्हईवाल्याला पाहीलं..बरीच वर्षं झाली असतील नक्कीच कारण तो कल्हईवालाही म्हाताराच होता..पाठीत वाकलेला..डोक्यात पिकलेला..थरथरत्या हातांचा आणि लटपटत्या पायांचा..त्याच्या वयाच्याच एका वडाच्या झाडाखाली त्यानं आपलं बस्तान मांडलं होतं..जमिनीत खड्डा खणून त्यात लावलेली भट्टी..शेजारीच तांब्याची भांडीकूंडी..पलिकडे त्याची झोळी..त्यात असली नसलेली त्याची धनदौलत..वाकून भट्टीचा भाता फुंकताना त्याची छातीही फुलून येत होती..पांढ-या दाढीत अडकणारे राखेचे काळे-करडे पापुद्रे..डोळ्यांत शिरणारी..सरावानं थरथरत्या हातांनाही कामाला लावून चटपट एक एक भांडं घेऊन झटपट त्यात कथलाचे तुकडे टाकून मग त्यांचं पाणी होताच, जाडसर कापडानं भांड्याला त्याचा मेकअप करणं..क्षणांत ते काळंकूंडं भांडं पोर्णिमेच्या चंद्रासारखं लख्ख उजळून निघतं..सारं काही तेच..पण आत कुठेतरी बदल झालाय याची जाणीवही होत होती..
कल्हईवाला येत नाही याची आठवणही आजवर कधी झाली नव्हती..मग त्याच्या न येण्यानं हळहळण्याचा प्रश्नच नव्हता..किती सहजपणे विसरून गेलो त्याला..हे विस्मरणही विस्मरणातच गेले होते..एक काळ बघता बघता बदलला होता..संपला होता..
कल्हईवाला आज दिसला तरी..उद्या दिसणार नाही..आणि असा कोणी कल्हईवाला होता याची जाणीवही कोणाला राहणार नाही..काळाच्या ओघात काय काय गमावून बसतो आहोत आपण आणि तरीही आपला माज काही सुटत नाही..
डोळ्यांपुढे सारी नश्वरता दिसूनही अमरत्वाची हौस काही केल्या फिटत नाही..संगणकावर नको असलेल्या गोष्टी डीलीट करून आपण रिसायकल बिनमध्ये टाकून देतो..त्या पुन्हा रिस्टोर करता येतात..पण आयुष्यात अशी सोय मात्र उपलब्ध नाही..इथं जे डिलीट झालंय..होणारेय..ते कायमचंच नाहीसं होणार आहे..
का कुणास ठाऊक त्या कल्हईवाल्याच्या चेह-यात मला माझाच चेहरा दिसला आणि मी थरारलो..पण मग शांतही झालो..मी काही अपवाद नाही..सा-यांची शेवटी हीच गती होणार आहे..सा-यांचीच.

No comments:

Post a Comment