Wednesday, June 7, 2017

#इच्छामरणाचाअधिकार

जगाची लोकसंख्या आता ८०० कोटींच्या आकड्याकडे वाटचाल करत आहे. भारताचीही १५० कोटींच्या आकड्याकडे दमदार वाटचाल सुरू आहे. पण यो दोन्ही गोष्टींचा अभिमान बाळगण्याऐवजी छातीत धडकी भरावी असं हे वास्तव आहे. इतकी मोठी लोकसंख्या पोसणं ही पृथ्वीची क्षमता नाही. आपला देशही त्याला अपवाद नाही. ही इतकी प्रचंड लोकसंख्या असण्याला आपले काही मूर्ख विचारच जबाबदार आहेत. मनुष्य प्राण्याला दिलं जाणारं अवास्तव महत्त्व आणि त्याचं जगणं ही जणू जगातली एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे अशा पद्धतीनं मानवी जगण्याचा अकारण केला जाणारा गौरव. त्यांतून माणसाला नाकारण्यात आलेला मृत्युचा अधिकार आणि तो गुन्हा मानण्यात येणं. हा भंपक आणि अव्यवहारी निर्णय बदलण्यात आला नाही तर आपला देश आणि ही पृथ्वीही लवकरच नष्ट होईल आणि तीही अतिशय घृणास्पद रितीनं. स्टिफन हॉकिंग हा शास्त्रज्ञ पृथ्वीला केवळ शंभर वर्षे देतोय. या शंभर वर्षांत माणसानं राहण्याची नवी जागा शोधली नाही तर ही पृथ्वी या माणसांच्या वजनाखाली चिरडून जाईल. मानवी जात नष्ट होईल. हे काही भाकित नाही. हे एक अटळ असं सत्य आहे ज्याकडे सारेच दूर्लक्ष करत आहेत. मग त्याला धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक किंवा मानवीय अशी कोणतीही कारणं असोत. हे दूर्लक्ष होत आहे हे सत्य आहे आणि ते आपल्याला शेवटी उध्वस्त करणार हेही तितकंच सत्य आहे. यांतून वाचण्यासाठी अनेक उपाय करावे लागतील. ज्यात जन्मदरावर नियंत्रण हा एक महत्त्वाचा उपाय आहे तसाच मृत्युदर वाढवण्याचाही उपाय असायला हवा. आपण काही प्रमाणात जन्मदरावर नियंत्रण ठेवत आहोतच. पण मृत्युदर वाढवण्याकडे मात्र आपण जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहोत. हे साहजिकच आहे कारण एकदा जन्माला आल्यानंतर कोणी मरायला सहसा तयार होत नाही. ज्यांना मरायचं असतं अशांना कायदा, धर्म, मानवतावाद आडवा येतो. त्यामुळे इच्छा असूनही लाखो लोक मरण्यासाठी तळमळत जगत राहतात. ही परिस्थिती आता बदलायला हवीच. 
माणूस हा मर्त्य आहे. तो वृद्ध होत असतो. जीवंत असेपर्यंत तो काही कायम अजर अमर नसतो. त्यामुळे कोणालाही कधीही कोणतीही व्याधी होऊन, अपघात होऊन तो लुळापांगळा होतो किंवा त्याला काही झालं नाही तर मग त्याचं वाढतं वय त्याला अशक्त करत जातं. माणसानं सन्मानानं जगावं त्यातच त्याचं मोठेपण आहे. पण ते होत नाही. खरंतर प्राचीन संस्कृतीत माणसानं ही गोष्ट ओळखली होती आणि त्याप्रमाणे आपल्या जगण्याचे विभाग करून ते त्यानुसार जगत होते. भारतात आढळणारी चार आश्रमांची संकल्पना हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. वय झाल्यावर संसारातून अंग काढून घ्यावं आणि मरणाची तयारी करावी हा याचा हेतू होता. पण आपण हा हेतू आता आपल्या स्वार्थापायी विसरलो आहोत. वैद्यक शास्त्र, औषधशास्त्र यांच्या प्रगतीमुळे मानवी जीवन सुकर झालं आहे. पैसा असल्यानं राहणीमानही चांगलं झालं आहे. परिणामी आपली आयुष्यं लांबली आहेत. पण ही लांबलेली आयुष्य महत्वाची आहेत का, त्याला काही अर्थ आहे का याचा कोणी विचार करत नाही. लोक नुस्तेच जगत राहतात. आपल्याला त्रास होतोय व आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतोय याची कोणती जाणीवच लोकांमध्ये उरलेली नाही. नात्यांच्या दबावाखाली, समाजाच्या दबावाखाली, भावनांच्या दबावाखाली माणसं जगत राहतात, इतरांना जगवत राहतात. याचे रोजचे परिणाम मात्र भीषण असतात. याचे दूरगामी परिणाम तर विचारायलाच नको. माणसं जितकी जास्त तितका व्यवस्था, यंत्रणांवरचा ताण वाढत जातो. नवीन लोकांना कमी संधी उपलब्ध होतात. देशाचा पाया डळमळीत होत जातो.
हे टाळायचं असेल तर आपल्याला मृत्युदर वाढवण्याचा विचार करावा लागेल. जन्माचं प्रमाण आणि मृत्युचं प्रमाण यांचा समतोल राखावा लागेल. सध्या जन्मदर जास्त आणि मृत्युदर कमी आहे ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यासाठी इच्छामरण हा एक उपाय आहे. कायद्यानं याची परवानगी मिळायला हवीच. पण ती मिळत नाही म्हणून जगत राहायचं असंही नाही. मृत्यु हे वरदान आहे आणि ते आपल्या हातांत आहे. मृत्यु नसताच तर काय परिस्थिती ओढवली असती याचा विचारही अंगाला शहारे आणतो. तेव्हा मृत्यु अशुभ, वाईट, भीतिदायक, घृणास्पद आहे ही भावना मनातून काढून टाका. मृत्युचं स्वागत करायला शिका. त्याचा विचार करा. सतत विचार करा. डोळसपणे व्यवहार लक्षात घेऊन विचार करा. स्वार्थ बाजूला ठेऊन विचार करा. इतरांचा विचार करून याचा विचार करा. कधीतरी आपण या जगाचं देणं लागतोय या भावनेतून विचार करा. आपल्या जीवंत असण्याची आपल्याला खरंच गरज आहे का याचा विचार करा. आपल्या असण्यानं आपलं, कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं काही भलं होतंय का याचा विचार करा. ते जर होत नसेल, आपल्यामुळे आपल्या स्वतःलाच त्रास होत असेल, त्यात सुधारही होत नसेल, त्यामुळे आपल्यावर आणि कुटुंबावर भार पडत असेल, आपल्यामुळे इतरांचं जगणं विस्कळीत होत असेल तर आपण का जगायचं याचा नक्की विचार करा.
हे कदाचित सारं वाचताना शहारे येतील अंगावर, भीति वाटेल, राग येईल, पण तरीही याचा विचार करा. तुम्ही तरुण असाल तर हीच योग्य वेळ आहे यावर विचार करण्याची कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचीही तरतुद करता येईल. तुम्ही वृद्ध असाल तर हीच योग्य वेळ आहे यावर निर्णय घेण्याची. पूर्ण समाधानानं आयुष्याचा निरोप घेणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. एखाद्या योग्यालाही ते शक्य होत नाही सहसा. जगण्याच मोह हा असा जबरदस्त असतो. पण भावनांपेक्षा जिथं व्यवहार बघणं गरजेचं असतं अशी ही एक गोष्ट आहे. हे कदाचित आत्ता वाचताना पटणार नाही पण निदान त्यावर विचार करणं तरी सुरू करा. जीवंतपणी तुम्ही कोणाला नकोसं होणं, तुम्हाला इतरांच्या जगण्याचा तिरस्कार करावा लागणं या दोन्ही गोष्टी अत्यंत वाईट असतात. तशी वेळ येण्याआधीच आनंदानं, समाधानानं आयुष्याचा पूर्णविराम करण्याची संधी साधणं हे एक काम जरी केलं तरी आपल्या जगण्याचं सार्थक होईल.

यावर निदान आपण चर्चा तरी सुरू करुयात. 

Friday, June 2, 2017

#ब्युटीफूल

दक्षिण कोरिया हा संवेदनशील चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. आशियाच नव्हे तर संपूर्ण जगातही माझ्या आवडीचे उत्तम चित्रपट हे दक्षिण कोरियात बनतात असं माझं मत झालं आहे. नुक्ताच मी ब्युटीफूल नावाचा चित्रपट पाहिला. किम की डुक या प्रतिभावंत पण अवलिया चित्रपट दिग्दर्शकाच्या मूळ कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटाची कथा आहे एका अत्यंत सुंदर मुलीची. पण या सौंदर्याचा तिला आनंद मिळण्याऐवजी प्रचंड त्रासच होतो. ती जिथे जाईल तिथे तिला लोकांच्या हपापलेल्या नजरांनी सामोरं जावं लागतं. याची तीव्रता इतकी वाढते की तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा एक तरुण तिच्यावर बलात्कार करतो. तो स्वतःला त्यानंतर पोलिसांच्या स्वाधिनही करतो. पण या सर्वांचा दोष तो स्वतःला नाही तर त्या मुलीलाच देतो. तिच्या सौंदर्यानंच त्याला फितवलं, त्याची बुद्धी भ्रष्ट केली असं तो तिलाच सांगतो. तो तुरुंगात जातो पण इकडे या मुलीवर त्याचा मानसिक परिणाम होतो. आपल्या सौंदर्याचा तिला तिरस्कार वाटू लागतो आणि ते नष्ट करण्यासाठी ती कधी अती खाणं तर कधी काहीच न खाणं असे प्रयोग करायला लागते. त्यांतून तिचं सौंदर्य नष्ट होत नाही पण तिचं स्वास्थ्य मात्र उतरणीला लागतं. तिला सर्वत्र तिच्यावर बलात्कार करणारा तो पहिला तरुण दिसतो. याच दरम्यान एक पोलिसही तिच्या प्रेमात पडलेला असतो. तोही तिच्यावर बलात्कार करतो. ती त्याचा खून करते. त्यानंतर समोर येणा-या अनेकांना मारते. शेवटी पोलिस तिला मारतात. पण मेल्यानंतरही तिची विटंबना थांबत नाही. शवविच्छेदनासाठी जेव्हा तिचा मृतदेह नेण्यात येतो तेव्हा तिथला एक कर्मचारीही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो.
सौंदर्य हे निसर्गदत्त असते. त्यात त्या व्यक्तिचं कर्तृत्त्व नसतं. त्यामुळे त्याचा नको तितका अभिमान बाळगणं चुकच. पण या सौंदर्याचा दुसराही सोयिस्कर अर्थ अनेक पुरुष लावतात. तो म्हणजे हे सौंदर्य उपभोगायलाच हवं. किंवा अशा सौंदर्यवती या पुरुषांच्या प्रेमात पडायला तयारच बसलेल्या असतात. सुंदर मुलींवर भरवसा ठेवता येत नाही असाही अनेकांचा समज असतो. सुंदर स्त्री घरात असणं म्हणजे संकटाला निमंत्रण हाही अनेक कुटुंबाचा विश्वास असतो. या सर्व गोष्टी होत असताना त्या मुलीला काय वाटतं याचा विचार फार कमी लोक करतात. तीही इतर चार मुलींसारखीच आहे याचा विसर लोकांना पडतो. सौंदर्य हे फक्त कातडीपूरतं असतं असं म्हणतात. खरं सौंदर्य हे विचार व कृतींमध्ये असतं पण याकडे लोकांचं लक्ष जात नाही. या सौंदर्याच्या आडून स्वतःची वासना शमवणं यापलिकडे दुसरा कोणताही उद्देश नसतो.

पण हे असं का घडतं हा प्रश्न आहे. पुरुष असे का वागतात हा प्रश्न आहे. आशियाई देशांमध्ये स्त्रीयांना कायम दुय्यम स्थान देण्यात आलं आहे. तर पुरुषांनाही अकारण डोक्यावर चढवून ठेवण्यात येतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये असलेलं अवघडलेपण, मित्रतेचा अभाव, एकमेकांना समान न मानण्याची शिकवण या सर्वांची परिणती अशा गोष्टींमध्ये होत असते. एखाद्याच्या सौंदर्याची प्रशंसा करणं व ती ऐकणं या दोन्ही गोष्टींत अजूनही एक अवघडलेपण असतं. त्यातली सहजता हरवल्यामुळे या साध्या नैसर्गिक गोष्टींबाबत एक अकारण कुतुहूल निर्माण झालेलं असतं. शारिरिक सौंदर्यावर त्या माणसाची प्रतिष्ठा ठरवण्याचा आणखी एक चूकीचा पायंडा आपल्या समाजात आहे. परिणामी जी माणसं सुंदर असतात त्यांच्यात अनावश्यक अभिमान येतो आणि जी सुंदर नाहीत ती कायम न्यूनगंडात जगत राहतात. मूळात एक व्यक्ति सुंदर किंवा दुसरी व्यक्ति कुरुप आहे असं समजणं हेच चुकीचं आहे. प्रत्येकजण त्याच्या परीनं सुंदरच असतो. शरीरानं नाहीतर मनानं. विचारांनी किंवा कृतीनं. ते समजून घ्यायला हवं. आपली कुरुपताही यातच दडलेली असते. स्वतःविषयी हीन भावना असेल तरच इतरांचा आपल्याला हेवा वाटतो. आपल्यात काही उणीवा आहेत असा गैरसमज असल्यानेच इतरांविषयी आपल्याला तिरस्कार वाटतो. हा तिरस्कार मग अशा पद्धतीनं बाहेर पडत असतो. हे बदलायचं असेल तर आपल्या समाजाची ही चूकीची समजूत आधी बदलायला लागेल. समाज मग तो कोरियन असो वा भारतीय, त्याच्या या समजूती सारख्याच असतात. या चित्रपटांतून हेच शिकायचं आहे. 

#तंत्रज्ञानाचेगुलाम

तंत्रज्ञान माणसाला कसं क्षुद्र करून सोडतं याचा सून्न करणारा अनुभव सध्या मी घेत आहे. माहिती तंत्रज्ञानानं जगाचं स्वरुप बदललं यात शंकाच नाही. पण यात माणूसही अंतर्बाह्य बदलला आणि त्याच्या अस्तित्वाला जो काही अर्थ आणि महत्त्व होतं त्याच्यातही बदल झाला आहे. हा बदल दूर्दैव्यानं चांगला कमी आणि वाईट जास्त आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे अनेकांची आयुष्यं चांगल्या अर्थानं बदलली आहेत यात शंकाच नाही. पण त्याचवेळी असं दिसून येतंय की माणसाच्या अस्तित्वाला या तंत्रज्ञानानं पोखरून काढायला सुरूवात झाली आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात माणसाचं महत्त्व हे दिवसेंदिवस कमी होत चाललंय.
ज्या अवाढव्य कंपन्यांच्या मदतीनं हे आधुनिक तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आवाक्यात येतंय त्यांचं योगदान नाकारून चालणार नाही. पण हे मान्य केल्यानंतर मात्र त्यांतून माणसाला उपयोगी असं काय त्यांच्याकडून मिळतंय असा प्रश्न विचारला तर मात्र त्याचं उत्तर नकारात्मक जास्त येतंय. या कंपन्यांच्या नजरेत माणूस हा केवळ एक ग्राहक आहे आणि त्याला कसं निरनिराळ्या पद्धतीनं गंडवायचं आणि त्याचवेळी त्याला आपल्या जाळ्यातून निसटू न देण्यासाठी काय काय युक्त्या करायच्या या एकाच पद्धतीनं हा सारा व्यवहार सुरू असतो.
मी सध्या रिलायन्स ब्रॉडबॅन्डची सेवा घेतोय किंवा घेत होतो असं म्हणायला हवा खरं तर. माझ्या कामाच्या संदर्भात मला अशी सेवा उपयोगी पडते. सुरूवातीच्या काळात ही सेवा चांगली चालली पण नंतर अडचणी व अडथळे सुरू झाले जे वाढतच गेलेत. महिन्यातील दहा ते पंधरा दिवस ही सेवा बंद असते आणि जेव्हा ती चालू असते तेव्हाही ती फारतर अर्धा एक तास सुरू असते आणि पुन्हा बंद होते. पण यांना महिन्याचं बिल भरावं लागतं आणि ते भरलं नाही तर रोज त्यासाठी तगादा सुरू होतो. एसेमेस, इमेल्स आणि कॉल्स सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही बिल भरायलाच पाहिजे याचा हा दबाव आणला जातो. एवढी तत्परता त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मात्र ते कधीही दाखवत नाही.
आपण पाठवलेल्या इमेल्सला त्यांच्याकडून इतक्या प्रेमानं व सभ्यतेनं उत्तर पाठवलं जातं की ते संगणकीय उत्तर असावं याची शंका येते. तक्रार केल्यानंतर तीनचार दिवसानंतर त्यांचं उत्तर येतं की तुमची समस्या आम्ही सोडवलेली आहे. ही समस्या कधी व कशी व कोणी सोडवलेली असते हे मला अजूनही कळलेलं नाही. अनेकदा सांगूनही त्यांनी कधीच त्यांच्या कोणत्याही माणसाला माझ्याशी बोलायला पाठवलं नाही. यावेळेस मी त्यांचं बिल भरलेलं नाही तर त्यांनी माझी इंटरनेट सेवा खंडीत केली आहे. पण बिल भरण्याचा तगादा तसाच आहे. या प्रकरणाची ट्राईकडे तक्रार करावी म्हणून मी त्यांच्या साईटवर गेलो तर अशा तक्रारींचा महापूरच आहे तिकडे. त्यामुळे मी ते टाळलं. मी आता ग्राहक पंचायतीकडे जाण्याच्या विचारात आहे पण मी ते करेनच याची शाश्वती नाही.
आता हे सारं मी का सांगतोय तर त्याचं कारण आहे या कंपन्यांनी तंत्रज्ञानाची स्वप्नं दाखवून आम्हाला कसं त्यांचं गुलाम करून टाकलंय यासाठी. इंटरनेट असो किंवा मोबाईल रिचार्ज असो, दिवसरात्र त्यावर ऑफर्सचा मारा सुरू असतो. या ऑफर्स इतक्या विचित्र आणि फसव्या आणि तोंडाला पाणी आणणा-या असतात की लोक सहज त्याला बळी पडतात. पण खरा त्रास त्यानंतर सुरू होतो. या योजनांना इतक्या पूर्व अटी आणि अटी असतात की त्यांतून ग्राहक नावाचा बोकड कधी कापला जातो ते त्याला कळतही नाही. दररोज या फसव्या ऑफर्सचा रतीब घालून तो पोसला जातो आणि रोज कापलाही जातो. या सर्व प्रकरणांत माणसाला माणूस म्हणून काडीचंही महत्त्वं उरलेलं नाही. त्याला तंत्रज्ञानाचे फायदे दाखवून, आधी गळाला लावायचं, मग तो कायम त्या जाळ्यात कसा राहिल याच्या योजना त्याच्यासमोर फेकायच्या.
या योजनांत दिली गेलेली आश्वासनं किती खरी आणि किती खोटी याची कोणतीही माहिती ग्राहकाला नसते. जितका डाटा देण्याचं आश्वासन दिलं जातं त्यातील किती डाटा खरंच मिळतो आणि किती खरंच वापरला जातो हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यांनी सांगायचं आणि आपण ते खरं मानायचं यापलिकडे आपल्या काही हातांत नसतं. ग्राहकांना आपली गरज आहे हे कंपन्यांना चांगलंच माहिती असतं आणि त्याचाच ते गैरफायदा घेतात.
इंटरनेट हे खरं तर माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या कामासाठी उपयुक्त ठरतं. मनोरंजनासाठी त्याचा मी क्वचितच उपयोग करतो. त्यामुळे ही सेवा खंडीत होण्याचा त्रास मला जास्त होतोय. कंपन्यांना ही गोष्ट माहित असल्यानं त्याचा ते अचूक फायदा उठवतात. त्यामुळे या कंपन्याच्या विरोधातही जाता येत नाही. एकटा माणूस इतक्या अवाढव्य कंपन्यांशी कसा लढा देऊ शकतो हा माझ्यापुढचा प्रश्न आहे.
आपण महासत्ता असल्याचा दावा सध्या काही उत्साही लोक सातत्यानं करत असतात. महासत्ता असण्याचं लक्षण म्हणजे महासत्तेचे लाभ हे तळातल्या माणसांपर्यंत पोहोचणं. त्याला परवडेल अशा पद्धतीनं पोहोचणं. या कसोटीवर माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्या काही प्रमाणात ख-या उतरतात पण ब-याच प्रमाणात त्या केवळ ग्राहकांची लूटच करताहेत हे अगदी उघडपणे जाणवतं. आणि आपल्याला काही करता येत नाही ही अगतिकता जाणवून मन दुखावतं.

अशावेळी आधीची व्यवस्था चांगली होती असंही जाणवतं पण ते केवळ फसवं समाधान आहे हेही समजतं. कारण काळ पुन्हा मागे परतवता येत नाही. आणि माझी इच्छा असली तरीही जगाची काही तशी इच्छा नसते. शेवटी येऊन जाऊन मुद्दा तिथेच येतो जिथं माणूस म्हणून या अवाढव्य यंत्रणांसमोर त्याला काहीच महत्त्व नाही. त्याची इच्छा तोकडी पडते, त्याचा पैसा तोकडा पडतो, त्याचे प्रयत्न तोकडे पडतात. मुकाटपणे हे सारं सोसत जायचं कारण गरज आपल्याला आहे. त्यांना नाहीच. यांतून काही एक गोष्टी घडतील तेव्हा घडतील नाही असं नाही पण तोवर माझ्यासारख्या लाखोंना जो फटका बसलेला असेल ते नुकसान कधीच भरून निघणार नाही. दुःख याचं नाही की पैसा वाया जातोय. दुःख याचं आहे की माणूस म्हणून माझं अस्तित्त्व यापुढे दिवसेंदिवस कमीच होत जाणार आहे. आणि प्रयत्न करूनही हा कोसळ थांबवता येणार नाही. 

Sunday, May 28, 2017

अन्नदात्यांचा संप

येत्या १ जून पासून राज्यातील काही भागांतील शेतकरी संपावर जाणार आहेत. शेतकरी संपावर जाणं ही विलक्षण गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा ती दूर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही. आणि त्याला ते नाही तर आपणच जास्त जबाबदार आहोत. ज्याच्यामुळे आपण जीवंत आहोत त्याला जीवंत राहण्यासाठी आपण कधीही गांभीर्यानं विचार केला नाही. इतर अनेक उद्योगांसारखा शेती हा देखिल एक उद्योगच आहे असं समजणं आणि शेतक-यांना इतर कामक-यांसारखाच दर्जा देणं यांतून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आपण यांतला फरक लक्षात घेतलेला नाही. आपण मोबाईल, कार्स, कपडे, घर, सिमेंट, खेळणी यांच्याशिवाय जीवंत राहू शकतो पण अन्नाशिवाय जीवंत राहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली तर मात्र या संपाचं काय महत्त्व आहे ते कळू शकतं. शेतीच्या अवस्थेला कोण जबाबदार आहेत हा वेगळा भाग आहे पण या शेतक-यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे व त्यात आपण मागे पडतोय यात शंका नाही. आपण शेतीला तुच्छ लेखतो, मळकट पायजमा-शर्टातल्या मेहनती शेतक-याला आपण अपमानास्पद वागणूक देतो, त्याच्याशी बोलणं आपल्याला आपल्या प्रतिष्ठेच्या आड येतं, शेतीचं महत्त्व आपण ओळखू शकत नाही. या सर्व गोष्टी बदलण्याची वेळ आली आहे. महत्त्व मेहनतीला असतं, कपड्यांना नसतं. ऊनवारापावसांत जमिनीची मशागत करून आपल्यासाठी पिक-भाजीपाला पिकवणा-या या शेतक-यांना कमी लेखणं म्हणजे प्रत्यक्ष आयुष्याला कमी लेखण्यासारखं आहे. शेती व शेतक-यांना नाकारणं म्हणजे जगण्याला नाकारणं. ते होऊ नये ही इच्छा. हा संप टळेल न टळेल पण आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि पुन्हा कधी त्यांच्यावर ही वेळ न येवो यासाठी आपण सारेच प्रयत्न आणि प्रार्थना करूयात.

Saturday, May 27, 2017

# कन्नड लेखिका वैदेही आणि आपण

असहिष्णूतेच्या काळात लेखकांनी शांत बसायला नको असं आग्रही प्रतिपादन कन्नड लेखिका वैदेही यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन समारंभात केलं. महाराष्ट्रात त्यांनी असं प्रतिपादन केल्याला अनेक अर्थ आहेत. गुजराथनंतर काही प्रमाणात महाराष्ट्र संघाची प्रयोगशाळा ठरते की काय असं वाटण्याची अनेक उदाहरणं इथं गेल्या काही वर्षांत घडली आहेत. करा, बघा आणि वाट पाहून पुन्हा करा, असा काहीसा प्रकार सध्या सुरू आहे. धार्मिक संस्था व व्यक्तिंचा वाढता बडेजाव, उद्दाम सामाजिक संघटनांचा विखारी प्रचार, साहित्यिकांची केली जाणारी पद्धतशीर हेळसांड, सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात अत्यंत खालच्या पातळीवर जाण्याची तयारी, याने राज्यानं वातावरण ढवळून निघालं आहे. काहींना यात मात्र काहीच वावगं वाटणार नाही. विरोधक उगाच बोंबा ठोकतात असं सर्व भक्त मंडळींचं लाडकं मत असतं. ते तसे का बोलतात हे समजून घेण्याची मात्र त्यांची कधीच तयारी नसते. पण सर्व सामान्य माणसांनी असली अक्षम्य चूक करण्यात शहाणपणा नाही. नाहीतर त्यांची त्या बेडकासारखी गत होईल ज्याला एका पाण्याच्या भांड्यात ठेवून त्याच्या खाली आग लावून त्याचं तापमान हळूहळू वाढवण्यात आलं. त्या उबदार पाण्याची सवय त्याला झाली आणि आपण काही काळानं यातच उकळून मरूही शकतो ही जाणीवच त्याला झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा उशीर झालेला होता. तेव्हा वैदेही सांगतात तसं आपण शांत न बसता आपल्याला जे लहान सहान चटके आत्ता बसताहेत त्यांच्या विरोधात आत्ताच आवाज करणं गरजेचं आहे. नाहीतर आग लागून आपण कधी भस्मसात होऊ ते आपल्याला कळणारही नाही. तेव्हा मौन सोडा आणि व्यक्त व्हा. 

Thursday, May 25, 2017

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

या चार ओळी प्रत्यक्षात उतरवणं किती कठीण असतं याचा अनुभव अनेकदा घेतला आहे मी. त्यातली अलीकडची एक गोष्ट म्हणजे इंग्रजी कादंबरी लेखन. मराठीला जागतिक पातळीवर न्यायचं असेल तर मराठी साहित्य इंग्रजीत अनुवादीत होण्याला पर्याय नाही. मी स्वतः सगळीकडे याचा उच्चार करीत असतो. प्रत्यक्षात मराठी-इंग्रजी अनुवादाची आपल्याकडे अत्यंत वाईट अवस्था आहे. शेवटी माझ्या एका कादंबरीचा (मोघ पुरुस) इंग्रजी अनुवाद (द थाऊजंड ब्लुम्स) करण्याचं मी ठरवलं. मागील तीन महिन्यात झटापट केल्यानंतर एकदाचा हा अनुवाद पूर्ण झाला आहे. मी स्वतः जे इतरांना सांगत फिरतो ते शेवटी मी करू शकलो याचा आनंद आहे. ही कादंबरी प्रकाशित होण्यासाठी ती आता देशी व परदेशी प्रकाशकांकडे मी पाठवणार आहे. कोणत्याही वशिल्याशिवाय, भेदभावाशिवाय ही कादंबरी विचारात घेण्यात येईल आणि तिचे जे काही गुणदोष असतील त्यानुसार तिचं भवितव्य जे ठरेल ते ठरेल. माझ्यासाठी हा पुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतात तसं. तसं तेठरू शकेल किंवा काहीच होणार नाही. कधीतरी आपल्याला सारं आयुष्य पणाला लावावं लागतं माझ्याबाबतीत ती वेळ या कादंबरीसाठी आली आहे. त्यामुळेमाझ्यापुरता एक निर्णय मी घेतला आहे. ही कांदबरी माझ्यासाठी खूप विशेष आहे. त्याचा जो विषय आहे त्यावर लिहिल्याशिवाय मी इतर कोणत्याही लिखाणाकडे जायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. दुसरं असं की ही कादंबरी प्रकाशित नाही झालीच तर यापुढे काहीही मी लिहू शकणार नाही. कारण अन्य सर्व गोष्टी याच्यापुढे नगण्य आहेत. त्या फार तर माझ्या लिखाणाची हौस भागविणा-या गोष्टी ठरतील. त्यामुळे त्या लिहिल्या नाही गेल्या तरी त्यानं काही मला फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे ही कादंबरी प्रसिद्ध झाली नाही तर तो एकप्रकारचा लेखन सन्यासच असणार आहे. मी स्वतः ती प्रसिद्ध करू शकतोच पण त्यात काही अर्थ नाही. मी स्वतः कोणताही खर्च न करता, माझ्या अटींवर, इतरांना ती पसंत पडली तरच मला ती प्रसिद्ध व्हायला आवडेल. आता हे सारं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे काही गोष्टी लोकांच्या साक्षीनं झालेल्या ब-या असतात. आज मी जे लिहिलंय त्याच्या विरोधात मी वागू लागलो तर हा पुरावा तरी राहिल. थोडक्यात काय तर कादंबरी प्रसिद्ध झाली तर माझ्यासकट सर्वांचाच फायदा. पण नाही झाली तर वाचकांची माझ्या लिखाणातून सुटका होईल. माझाही स्वतःच्या लिखाणाबद्दल असलेला भ्रमाचा भोपळा फुटेल आणि काही व्यावहारीक गोष्टींकडे मी जास्त लक्ष देऊ शकेन. तुर्तास हे इतकंच.
हेन्री मिलरनं रिम्बाँ या कवीबद्दल द टाईम ऑफ द असॅसिन्स नावाचं अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे. महेश एलकुंचवारांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद सध्या लोकसत्तेच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत असतो. रिम्बाँ, मिलर या दोघांशीही मला स्वतःचं नातं जाणवतं. हे असं जाणवतं तेव्हा कलावंत हा कोठेही असला की त्याच्या वेदना या जवळपास सारख्याच असतात याची पुन्हा जाणीव होते. त्यात मिलरनं रिम्बाँच्या पुस्तकाबाबत लिहिलं आहे- When he was writing his ‘nigger book’ ( Une Saison en Enfer – the season in hell), Rimbaud is said to have declared: “My fate depends on this book!” How profoundly true that statement was not even Rimbaud himself knew. As we begin to realize our own tragic fate, we begin to perceive what he meant. He had identified his fate with that of the most crucial epoch known to man. Either, like him, we are going to renounce all that our civilization has stood for thus far, and attempt to build afresh, or we are going to destroy it with our own hands. When the poet stands at nadir the whole world must indeed be upside down. If the poet can no longer speak for society, but only for himself, then we are at the last ditch.
मिलरला उशीरा का होईना पण मान्यता मिळाली. त्याची बरीचशी स्वप्नं पूर्ण झाली. रिम्बाँ मात्र वयाच्या ३७ व्या वर्षी गँगरीन होऊन परक्या देशात परक्या लोकांच्या सहवासात भणंग अवस्थेत मरण पावला. इतकंच.


१- सोशल मीडियावरील आंधळे युद्ध

शहाण्या लोकांनी म्हणून ठेवलं आहे की जो बोलताना तोंड सैल सोडतो तो संकटात सापडतो. सध्या अशा संकटग्रस्त लोकांची संख्या वाढतच आहे. त्याला कारण आहे सोशल मीडियावर वावरताना जाणारा तोल. बोलणं असो वा लिहिणं असो, शब्दांचा अनुचित वापर झाला की त्यातून सावरण्याची संधी इथं फारच कमी वेळा मिळते. हे झालं लिहिणा-याचं. पण जे लोक या गोष्टी वाचतात तेही त्या मागची संपूर्ण घटना समजून न घेताच तावातावानं प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. यात जे सत्य कुठल्याकुठे दवडल्या जातं त्याचा शोध घेण्याचा कोणी फारसा प्रयत्न करताना दिसत नाही. सोशल मीडियावर सध्या या दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये तुंबळ युद्ध सुरु आहे. यातील दोन गटांची ओळख करणं फार सोपं आहे. एक गट स्वतःला पुरोगामी सहिष्णू समजतो तर दुसरा स्वतःला राष्ट्रवादी देशभक्त समजतो. एकानं आपलं मत मांडलं की दुसरा त्यावर तुटून पडतो. ते मत योग्य आहे की अयोग्य आहे याचाही विचार कोणी करत नाही. यात दोन्ही बाजूंचा समावेश होतो. विरोध करणारे असोत वा समर्थन करणारे असो, कोणताही विचार न करता विरोधक विरोध करतात आणि समर्थक समर्थन करतात. या आंधळ्या युद्धांत डोळस तत्थ्यांचा पहिला बळी जातो. नंतर बळी पडतो सामंजस्याचा. एकमेकांचा विरोध करणं यात चूकीचं काही नाही. मतभिन्नतेमुळे असा विरोध हा स्वाभावीक असतो. पण त्यात आंधळ्या विश्वासाचं विष कालवलं गेलं की त्याचं शत्रूत्वात रुपांतर होतं. ही गोष्ट कोणाच्याही हिताची नाही. तुम्ही विरोधक असा वा समर्थक असा पण त्यात हा आंधळेपणा आणू नका.