येत्या १ जून पासून
राज्यातील काही भागांतील शेतकरी संपावर जाणार आहेत. शेतकरी संपावर जाणं ही विलक्षण
गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा ती दूर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी आणि
आपल्यासाठीही. आणि त्याला ते नाही तर आपणच जास्त जबाबदार आहोत. ज्याच्यामुळे आपण
जीवंत आहोत त्याला जीवंत राहण्यासाठी आपण कधीही गांभीर्यानं विचार केला नाही. इतर
अनेक उद्योगांसारखा शेती हा देखिल एक उद्योगच आहे असं समजणं आणि शेतक-यांना इतर
कामक-यांसारखाच दर्जा देणं यांतून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आपण यांतला
फरक लक्षात घेतलेला नाही. आपण मोबाईल, कार्स, कपडे, घर, सिमेंट, खेळणी
यांच्याशिवाय जीवंत राहू शकतो पण अन्नाशिवाय जीवंत राहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात
घेतली तर मात्र या संपाचं काय महत्त्व आहे ते कळू शकतं. शेतीच्या अवस्थेला कोण
जबाबदार आहेत हा वेगळा भाग आहे पण या शेतक-यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली
जबाबदारी आहे व त्यात आपण मागे पडतोय यात शंका नाही. आपण शेतीला तुच्छ लेखतो, मळकट
पायजमा-शर्टातल्या मेहनती शेतक-याला आपण अपमानास्पद वागणूक देतो, त्याच्याशी बोलणं
आपल्याला आपल्या प्रतिष्ठेच्या आड येतं, शेतीचं महत्त्व आपण ओळखू शकत नाही. या
सर्व गोष्टी बदलण्याची वेळ आली आहे. महत्त्व मेहनतीला असतं, कपड्यांना नसतं.
ऊनवारापावसांत जमिनीची मशागत करून आपल्यासाठी पिक-भाजीपाला पिकवणा-या या
शेतक-यांना कमी लेखणं म्हणजे प्रत्यक्ष आयुष्याला कमी लेखण्यासारखं आहे. शेती व
शेतक-यांना नाकारणं म्हणजे जगण्याला नाकारणं. ते होऊ नये ही इच्छा. हा संप टळेल न
टळेल पण आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि पुन्हा कधी
त्यांच्यावर ही वेळ न येवो यासाठी आपण सारेच प्रयत्न आणि प्रार्थना करूयात.
Sunday, May 28, 2017
Saturday, May 27, 2017
# कन्नड लेखिका वैदेही आणि आपण
असहिष्णूतेच्या
काळात लेखकांनी शांत बसायला नको असं आग्रही प्रतिपादन कन्नड लेखिका वैदेही यांनी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन समारंभात केलं. महाराष्ट्रात त्यांनी असं
प्रतिपादन केल्याला अनेक अर्थ आहेत. गुजराथनंतर काही प्रमाणात महाराष्ट्र संघाची
प्रयोगशाळा ठरते की काय असं वाटण्याची अनेक उदाहरणं इथं गेल्या काही वर्षांत घडली
आहेत. करा, बघा आणि वाट पाहून पुन्हा करा, असा काहीसा प्रकार सध्या सुरू आहे.
धार्मिक संस्था व व्यक्तिंचा वाढता बडेजाव, उद्दाम सामाजिक संघटनांचा विखारी
प्रचार, साहित्यिकांची केली जाणारी पद्धतशीर हेळसांड, सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात
अत्यंत खालच्या पातळीवर जाण्याची तयारी, याने राज्यानं वातावरण ढवळून निघालं आहे.
काहींना यात मात्र काहीच वावगं वाटणार नाही. विरोधक उगाच बोंबा ठोकतात असं सर्व
भक्त मंडळींचं लाडकं मत असतं. ते तसे का बोलतात हे समजून घेण्याची मात्र त्यांची
कधीच तयारी नसते. पण सर्व सामान्य माणसांनी असली अक्षम्य चूक करण्यात शहाणपणा
नाही. नाहीतर त्यांची त्या बेडकासारखी गत होईल ज्याला एका पाण्याच्या भांड्यात
ठेवून त्याच्या खाली आग लावून त्याचं तापमान हळूहळू वाढवण्यात आलं. त्या उबदार
पाण्याची सवय त्याला झाली आणि आपण काही काळानं यातच उकळून मरूही शकतो ही जाणीवच
त्याला झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा उशीर झालेला होता. तेव्हा वैदेही सांगतात
तसं आपण शांत न बसता आपल्याला जे लहान सहान चटके आत्ता बसताहेत त्यांच्या विरोधात
आत्ताच आवाज करणं गरजेचं आहे. नाहीतर आग लागून आपण कधी भस्मसात होऊ ते आपल्याला
कळणारही नाही. तेव्हा मौन सोडा आणि व्यक्त व्हा.
Thursday, May 25, 2017
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
या चार ओळी प्रत्यक्षात उतरवणं किती कठीण असतं
याचा अनुभव अनेकदा घेतला आहे मी. त्यातली अलीकडची एक गोष्ट म्हणजे इंग्रजी कादंबरी
लेखन. मराठीला जागतिक पातळीवर न्यायचं असेल तर मराठी साहित्य इंग्रजीत अनुवादीत
होण्याला पर्याय नाही. मी स्वतः सगळीकडे याचा उच्चार करीत असतो. प्रत्यक्षात
मराठी-इंग्रजी अनुवादाची आपल्याकडे अत्यंत वाईट अवस्था आहे. शेवटी माझ्या एका
कादंबरीचा (मोघ पुरुस) इंग्रजी अनुवाद (द थाऊजंड ब्लुम्स) करण्याचं मी ठरवलं.
मागील तीन महिन्यात झटापट केल्यानंतर एकदाचा हा अनुवाद पूर्ण झाला आहे. मी स्वतः
जे इतरांना सांगत फिरतो ते शेवटी मी करू शकलो याचा आनंद आहे. ही कादंबरी प्रकाशित
होण्यासाठी ती आता देशी व परदेशी प्रकाशकांकडे मी पाठवणार आहे. कोणत्याही
वशिल्याशिवाय, भेदभावाशिवाय ही कादंबरी विचारात घेण्यात येईल आणि तिचे जे काही
गुणदोष असतील त्यानुसार तिचं भवितव्य जे ठरेल ते ठरेल. माझ्यासाठी हा पुढचा टप्पा
अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतात तसं. तसं तेठरू शकेल किंवा
काहीच होणार नाही. कधीतरी आपल्याला सारं आयुष्य पणाला लावावं लागतं माझ्याबाबतीत
ती वेळ या कादंबरीसाठी आली आहे. त्यामुळेमाझ्यापुरता एक निर्णय मी घेतला आहे. ही
कांदबरी माझ्यासाठी खूप विशेष आहे. त्याचा जो विषय आहे त्यावर लिहिल्याशिवाय मी
इतर कोणत्याही लिखाणाकडे जायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. दुसरं असं की ही कादंबरी
प्रकाशित नाही झालीच तर यापुढे काहीही मी लिहू शकणार नाही. कारण अन्य सर्व गोष्टी
याच्यापुढे नगण्य आहेत. त्या फार तर माझ्या लिखाणाची हौस भागविणा-या गोष्टी ठरतील.
त्यामुळे त्या लिहिल्या नाही गेल्या तरी त्यानं काही मला फारसा फरक पडणार नाही.
त्यामुळे ही कादंबरी प्रसिद्ध झाली नाही तर तो एकप्रकारचा लेखन सन्यासच असणार आहे.
मी स्वतः ती प्रसिद्ध करू शकतोच पण त्यात काही अर्थ नाही. मी स्वतः कोणताही खर्च न
करता, माझ्या अटींवर, इतरांना ती पसंत पडली तरच मला ती प्रसिद्ध व्हायला आवडेल.
आता हे सारं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे काही गोष्टी लोकांच्या साक्षीनं
झालेल्या ब-या असतात. आज मी जे लिहिलंय त्याच्या विरोधात मी वागू लागलो तर हा
पुरावा तरी राहिल. थोडक्यात काय तर कादंबरी प्रसिद्ध झाली तर माझ्यासकट सर्वांचाच
फायदा. पण नाही झाली तर वाचकांची माझ्या लिखाणातून सुटका होईल. माझाही स्वतःच्या
लिखाणाबद्दल असलेला भ्रमाचा भोपळा फुटेल आणि काही व्यावहारीक गोष्टींकडे मी जास्त
लक्ष देऊ शकेन. तुर्तास हे इतकंच.
हेन्री मिलरनं रिम्बाँ या कवीबद्दल द टाईम ऑफ द
असॅसिन्स नावाचं अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे. महेश एलकुंचवारांनी केलेला त्याचा
मराठी अनुवाद सध्या लोकसत्तेच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत असतो.
रिम्बाँ, मिलर या दोघांशीही मला स्वतःचं नातं जाणवतं. हे असं जाणवतं तेव्हा कलावंत
हा कोठेही असला की त्याच्या वेदना या जवळपास सारख्याच असतात याची पुन्हा जाणीव
होते. त्यात मिलरनं रिम्बाँच्या पुस्तकाबाबत लिहिलं आहे- When he was
writing his ‘nigger book’ ( Une Saison en Enfer – the season in hell), Rimbaud
is said to have declared: “My fate depends on this book!” How profoundly true
that statement was not even Rimbaud himself knew. As we begin to realize our
own tragic fate, we begin to perceive what he meant. He had identified his fate
with that of the most crucial epoch known to man. Either, like him, we are
going to renounce all that our civilization has stood for thus far, and attempt
to build afresh, or we are going to destroy it with our own hands. When the
poet stands at nadir the whole world must indeed be upside down. If the poet
can no longer speak for society, but only for himself, then we are at the last
ditch.
मिलरला उशीरा का होईना पण मान्यता मिळाली. त्याची बरीचशी स्वप्नं
पूर्ण झाली. रिम्बाँ मात्र वयाच्या ३७ व्या वर्षी गँगरीन होऊन परक्या देशात परक्या
लोकांच्या सहवासात भणंग अवस्थेत मरण पावला. इतकंच.
१- सोशल मीडियावरील आंधळे युद्ध
शहाण्या लोकांनी म्हणून ठेवलं आहे की जो बोलताना
तोंड सैल सोडतो तो संकटात सापडतो. सध्या अशा संकटग्रस्त लोकांची संख्या वाढतच आहे.
त्याला कारण आहे सोशल मीडियावर वावरताना जाणारा तोल. बोलणं असो वा लिहिणं असो,
शब्दांचा अनुचित वापर झाला की त्यातून सावरण्याची संधी इथं फारच कमी वेळा मिळते.
हे झालं लिहिणा-याचं. पण जे लोक या गोष्टी वाचतात तेही त्या मागची संपूर्ण घटना
समजून न घेताच तावातावानं प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. यात जे सत्य कुठल्याकुठे
दवडल्या जातं त्याचा शोध घेण्याचा कोणी फारसा प्रयत्न करताना दिसत नाही. सोशल
मीडियावर सध्या या दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये तुंबळ युद्ध सुरु आहे. यातील दोन
गटांची ओळख करणं फार सोपं आहे. एक गट स्वतःला पुरोगामी सहिष्णू समजतो तर दुसरा
स्वतःला राष्ट्रवादी देशभक्त समजतो. एकानं आपलं मत मांडलं की दुसरा त्यावर तुटून
पडतो. ते मत योग्य आहे की अयोग्य आहे याचाही विचार कोणी करत नाही. यात दोन्ही
बाजूंचा समावेश होतो. विरोध करणारे असोत वा समर्थन करणारे असो, कोणताही विचार न
करता विरोधक विरोध करतात आणि समर्थक समर्थन करतात. या आंधळ्या युद्धांत डोळस
तत्थ्यांचा पहिला बळी जातो. नंतर बळी पडतो सामंजस्याचा. एकमेकांचा विरोध करणं यात
चूकीचं काही नाही. मतभिन्नतेमुळे असा विरोध हा स्वाभावीक असतो. पण त्यात आंधळ्या
विश्वासाचं विष कालवलं गेलं की त्याचं शत्रूत्वात रुपांतर होतं. ही गोष्ट
कोणाच्याही हिताची नाही. तुम्ही विरोधक असा वा समर्थक असा पण त्यात हा आंधळेपणा
आणू नका.
Subscribe to:
Posts (Atom)
