झेडब्रिजच्या खाली नदीपात्रातला रस्ता आहे. त्यावर जास्त करून मोटारबाइक्सचीच वर्दळ असते. मला तो तिथंच दिसला. झेडब्रिजवर संध्याकाळच्या वेळी शांतपणे सिगरेटचा आस्वाद घेताना लक्ष खालच्या रस्त्याकडे गेलं आणि तो नजरेत भरला.
विशीबाविशीचा तरूण होता तो. अंधारात त्याचा चेहरा फारसा दिसत नव्हता. येणा-या बाईक्सच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात त्याचं शरीर उजळून निघायचं पण त्याच्या शरीराचे काही तपशिल डोळ्यांत शिरण्याआधीच तो पुन्हा अंधारात दिसेणासा व्हायचा. पण काही गोष्टी तरीही दिसत होत्याच. त्याच्या पाठीवरची बॅग. अंगातले चांगले कपडे. एकंदरीत सभ्य आणि सुशिक्षित म्हणता येईल असाच होता तो.
संध्याकाळच्या वेळी, नदीपात्रातल्या त्या रस्त्यावर तो येणा-या बाईकस्वारांना लिफ्ट मागत होता. उजव्या हाताचा अंगठा उंचावून. लिफ्ट मागण्याची क्लासिक स्टाईल. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचं एवढं निरीक्षण करेपर्यंत निदान पाच वेळा तरी त्यानं अंगठा उंचावून लिफ्ट मागितली पण त्याला यश आलं नाही. माझी सिगरटे संपली होती पण आता उत्सुकता जागी झाली होती. त्याला लिफ्ट मिळाल्यानंतरच जावं असं वाटलं. का वाटलं माहित नाही?
किंवा खरं तर माहित होतं मला. मी स्वतः कधी कोणाला लिफ्ट मागत नाही. अगदीच गरज भासली तर मागतो. पण त्यातही मला वाईट अनुभवच आला आहे. त्यामुळे याला तरी लिफ्ट मिळते का हे मला बघायचं होतं. एव्हाना त्यानं दहाचा आकडा पार केला होता. लिफ्ट मागण्याचे काही नियम असतात. जे ज्याने त्याने आपापले ठरवायचे असतात. माझे नियम फार सोपे आणि कमी आहेत. पहिला नियम हा की होताहोईतो लिफ्ट मागायचीच नाही. दुसरा नियम हा की बायकांना आणि त्यातही मुलींना लिफ्ट मागायची नाही. कारण ती तशीही मिळण्याची संधी फारच कमी असते. तिसरा नियम नव्हताच. पहिल्या दोन नियमांतच आमचा गाशा गुंडाळलेला असायचा. नाही गाडी तर पायी जावं नाहीतर पैसे असल्यास रिक्षा करावा. हे माझं धोरण. त्यात स्वाभीमानाचा भाग बराच मोठा होता. ज्यांना स्वाभीमान नसतो तेच लिफ्ट मागतात असं काहीसं विचित्र मत आहे माझं याबाबतीत. त्याचं ते नसावं. कारण आता पंधराचा आकडा ओलांडला गेला होता. आणि त्याला लिफ्ट मिळाली नव्हती. त्यानंही चिकाटी सोड़लेली नव्हती. मला आता यात रस निर्माण झाला होता.
त्याचेही काही नियम होतेच. तो प्रत्येकालाच लिफ्ट नव्हता मागत. ज्यांच्या गाडीची मागची सिट रिकामी असेल त्यांनाच तो अंगठा दाखवत होता. ( हे स्वाभाविकच होतं.) त्यात मुलींचा, बायकांचा समावेश नव्हताच. याबाबतीत मला वाटतं सर्व मुलांचं एकमत होईल. मुली मात्र मुलांना लिफ्ट मागतात. हक्क असल्यासारख्या. किंबहून मुलंच स्वतःहून त्यांना लिफ्ट द्यायला उताविळ असतात. त्यांनी ती घेतली तर हे सातवे आसमानपर चढतात आणि नाकारली तर लगेच देवदास बनतात. असो.
हा हायफाय तरूणांना किंवा पुरूषांनाही लिफ्ट मागत नव्हता. त्यांचंही याच्याकडे लक्ष जात नव्हतंच. लिफ्ट मागण्यातही अमिरी-गरीबी असू शकते हे मला प्रथमच जाणवलं. तो फक्त त्याच्यासारख्याच कॉलेज तरूणांना किंवा मध्यमवर्गीय नोकरदारांनाच लिफ्ट मागत होता. विसचा आकडाही त्यानं पार केला होता. त्याच्या या चिकाटीला, लाचारीला, आळशीपणाला सलाम ठोकायचा की कीव करायची मला कळत नव्हतं.
माझ्या मनात वेगळेच विचार धावत होते. याला लिफ्ट न देण्यामागचं काय कारण असू शकेल याबाबत. याच्यावर विश्वास नसेल म्हणून..आजकाल विश्वास ही वस्तू खूपच दुर्मिळ झाली आहे..हा आपला घात करेल असं वाटणं स्वाभाविक आहे..काहींच्या मनात रागही असेल की मला जेव्हा गरज होती तेव्हा मला कोणी लिफ्ट देत नव्हतं..आता मी घेतली गाडी माझी..फक्त माझ्यासाठी..किंवा काहींना असंही वाटू शकतं की साले माजलेत हे लोक..आळशी झालेत..ना पैसा खर्चायला तयार ना चालायला तयार..मरू दे साल्याला..
माझ्या मनात आणखी वेगळा विचार..त्याला लिफ्ट दिली असती तर पेट्रोलचा खर्च वाढणार होता का..नक्कीच नाही..गाडीला नुकसान होणार होतं का..नक्कीच नाही..त्यालाही कदाचीत पुढेच जायचं असेल..त्याच रस्त्यानं..काही कारण असेल तसंच..त्याचा पाय दुखावला असेल..तब्येत ठिक नसेल..किंवा तो नविन असेल..रस्ता माहित नसेल..त्याचं म्हणनं ऐकूण घ्यायलाही आपण तयार नाही आहोत..मग उपयोग काय गाडी असण्याचा जर तिचा उपयोग कोणाची गरज भागवायला होत नसेल तर..समाजसेवा वगैरे शब्द वापरू नयेत इथं पण अगदी एक स्वाभाविक, माणसानं माणसाची मदत करावी ही संकल्पनाही का लयास गेली आहे अलीकडे..
त्याला लिफ्ट दिली असती तर कोणतंही जास्त काम करावं लागलं नसतं..पैसा खर्च करावा लागणार नव्हता..तरीही..कोणी त्याला मदत करायला तयार नव्हतं..मला स्वतःलाच अपराधी वाटलं..शरमल्यासारखं झालं..माणूस असल्याची लाज वाटली..वाटलं कशाला घ्यायच्या मग गाड्या..केवळ आपल्या पैशाचा माज मिरवण्यासाठी..आपली माणूसकी गहाण टाकून..
मला आता त्या तरूणाला लिफ्ट न मिळणं हा माझाच अपराध वाटू लागला होता..एकविस..बाविस..तेविस..चोविस..पंचविस..थांबला..शेवटी एक मध्यवयीन माणूस थांबला आणि त्यानं त्याला लिफ्ट दिली..मी सुटकेचा निश्वास टाकला..
मागितलं आणि मागितलं ते मिळण्यासाठी वाट पाहिली तर ते मिळंतही असा काहीसा निष्कर्षं मी यातनं काढणार नाही..त्याला लिफ्ट मिळाल्याच्या आनंदात मी आणखी एक सिगरेट शिलगावली आणि परत फिरलो, बस.

No comments:
Post a Comment