जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा कधीनाकधी मरणारच
असतो. तो जन्माला येतो ते आपलं मरण घेऊनच. ते मग कधी भेटेल हा ज्याच्या त्याच्या
नशिबाचा भाग असतो. अकाली मरण हे कधीही वाईटच. पण त्याचप्रमाणं अकाली जगत राहणं
हेही वाईटच. पण आपल्याला या दुस-या गोष्टीचा मात्र विसर पडतो. जगणं काही आपल्या
हाती नसतं पण मरण निश्चित असतं. त्याचा उपयोग मात्र आपण आजही समंजसपणे करत नाही ही
मानवी जीवनाची शोकांतिका आहे. पण काही विचारी लोकांना स्वेच्छामरणाचं महत्त्व
कळल्यानं त्यांनी आम्हाला आमच्या इच्छेनुसार आम्हाला हवं तेव्हा मरू द्यावं असा अधिकार
सरकारकडे मागितला होता. पण सरकारनं उदारपणे भूतदयावादी वृत्ती दाखवत तो अधिकार
नाकारला कारण त्यांचं म्हणणं असं की ही आत्महत्या आहे आणि जीवनाचा आपण आदर करायला
हवा. आदर करायला हवा हे खरंच पण त्याला काही अटी लागू असतात. सडत रखडत जगत राहायचं
आणि त्याला जर कोणी जीवनाचा आदर करणं म्हणत असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.
एखाद्याची इच्छा नसताना, त्याची शक्ति नसतानाही त्याला किंवा तिला जगत राहण्यासाठी
भाग पाडणं ही दया असली तरी अत्यंत क्रूर दया आहे. केवळ कोणी त्या मरणाचा गैरफायदा घेईल
म्हणून कोणाला मरूच द्यायचं नाही ही हास्यास्पद गोष्ट आहे. ज्यांना गैरफायदा
घ्यायचा आहे ते जीवंतपणीही तो घेऊ शकतात. आणि ज्या म्हाता-यांना आपल्या मुलांकडून
धोका असेल त्यांनी उलट त्यांची संपत्ती त्यांच्या इच्छेप्रमाणे तिची विल्हेवाट
लावल्यानंतर स्वतःहून मरण पत्करणं ही कधीही चांगली गोष्ट राहील. त्यातही गैरप्रकार
घडतीलच. पण ते इतरत्र घडत नाहीत, आता घडत नाहीत असं थोडंच आहे. त्यामुळे या एका
कारणासाठी एखाद्याला मरायचा अधिकार नाकारणं ही काही चांगली गोष्ट नाही.
या सर्व पार्श्वभूमिवर आता आदरनीय सर्वोच्च
न्यायालयानं किमान निष्क्रीय स्वेच्छामरणाला, काही अटींच्या आधारावर का होईना,
परवानगी देऊन स्वेच्छामरणाच्या बाबतीत एक मोठं पाऊल उचललं आहे. लढाई अजून बाकी
आहे. ती चालूच राहील. कारण आपल्या देशांत कोणत्याही गोष्टींवर एकमत होणं ही जवळपास
अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे स्वेच्छामरणाचा मुद्दाही सहमतीचा होणं कठीणच आहे.
पण आता त्यावर आम्ही थोडं तरी पुढे गेलो आहोत.
स्वेच्छामरणाचा लोकसंख्यावाढीशीही संबंध आहे. वाढली लोकसंख्या पाहता स्वेच्छामरणासारख्या
लोकसंख्या नियंत्रक गोष्टींना आधार देणं ही काळाची गरज आहे. अर्थात हे होईल तोवर
लोक मरायचे थांबतील असं काही नाही. आत्महत्या हा कालपर्यंत गुन्हा समजला जायचा. तो
सर्वांत मोठा विनोद होता आणि अर्थातच क्रुर होता. तो गुन्हा नाही हे मागे
न्यायालयानं सांगितलं आहे. आता स्वेच्छामरणाचाही अधिकार अशाच एका वाटचालीवर आहे. येत्या
काही काळांत त्याला एक चांगला आकार मिळेल असं मानायला हरकत नाही.

No comments:
Post a Comment