शहाण्या लोकांनी म्हणून ठेवलं आहे की जो बोलताना
तोंड सैल सोडतो तो संकटात सापडतो. सध्या अशा संकटग्रस्त लोकांची संख्या वाढतच आहे.
त्याला कारण आहे सोशल मीडियावर वावरताना जाणारा तोल. बोलणं असो वा लिहिणं असो,
शब्दांचा अनुचित वापर झाला की त्यातून सावरण्याची संधी इथं फारच कमी वेळा मिळते.
हे झालं लिहिणा-याचं. पण जे लोक या गोष्टी वाचतात तेही त्या मागची संपूर्ण घटना
समजून न घेताच तावातावानं प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. यात जे सत्य कुठल्याकुठे
दवडल्या जातं त्याचा शोध घेण्याचा कोणी फारसा प्रयत्न करताना दिसत नाही. सोशल
मीडियावर सध्या या दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये तुंबळ युद्ध सुरु आहे. यातील दोन
गटांची ओळख करणं फार सोपं आहे. एक गट स्वतःला पुरोगामी सहिष्णू समजतो तर दुसरा
स्वतःला राष्ट्रवादी देशभक्त समजतो. एकानं आपलं मत मांडलं की दुसरा त्यावर तुटून
पडतो. ते मत योग्य आहे की अयोग्य आहे याचाही विचार कोणी करत नाही. यात दोन्ही
बाजूंचा समावेश होतो. विरोध करणारे असोत वा समर्थन करणारे असो, कोणताही विचार न
करता विरोधक विरोध करतात आणि समर्थक समर्थन करतात. या आंधळ्या युद्धांत डोळस
तत्थ्यांचा पहिला बळी जातो. नंतर बळी पडतो सामंजस्याचा. एकमेकांचा विरोध करणं यात
चूकीचं काही नाही. मतभिन्नतेमुळे असा विरोध हा स्वाभावीक असतो. पण त्यात आंधळ्या
विश्वासाचं विष कालवलं गेलं की त्याचं शत्रूत्वात रुपांतर होतं. ही गोष्ट
कोणाच्याही हिताची नाही. तुम्ही विरोधक असा वा समर्थक असा पण त्यात हा आंधळेपणा
आणू नका.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment