Friday, June 2, 2017

#ब्युटीफूल

दक्षिण कोरिया हा संवेदनशील चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. आशियाच नव्हे तर संपूर्ण जगातही माझ्या आवडीचे उत्तम चित्रपट हे दक्षिण कोरियात बनतात असं माझं मत झालं आहे. नुक्ताच मी ब्युटीफूल नावाचा चित्रपट पाहिला. किम की डुक या प्रतिभावंत पण अवलिया चित्रपट दिग्दर्शकाच्या मूळ कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटाची कथा आहे एका अत्यंत सुंदर मुलीची. पण या सौंदर्याचा तिला आनंद मिळण्याऐवजी प्रचंड त्रासच होतो. ती जिथे जाईल तिथे तिला लोकांच्या हपापलेल्या नजरांनी सामोरं जावं लागतं. याची तीव्रता इतकी वाढते की तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा एक तरुण तिच्यावर बलात्कार करतो. तो स्वतःला त्यानंतर पोलिसांच्या स्वाधिनही करतो. पण या सर्वांचा दोष तो स्वतःला नाही तर त्या मुलीलाच देतो. तिच्या सौंदर्यानंच त्याला फितवलं, त्याची बुद्धी भ्रष्ट केली असं तो तिलाच सांगतो. तो तुरुंगात जातो पण इकडे या मुलीवर त्याचा मानसिक परिणाम होतो. आपल्या सौंदर्याचा तिला तिरस्कार वाटू लागतो आणि ते नष्ट करण्यासाठी ती कधी अती खाणं तर कधी काहीच न खाणं असे प्रयोग करायला लागते. त्यांतून तिचं सौंदर्य नष्ट होत नाही पण तिचं स्वास्थ्य मात्र उतरणीला लागतं. तिला सर्वत्र तिच्यावर बलात्कार करणारा तो पहिला तरुण दिसतो. याच दरम्यान एक पोलिसही तिच्या प्रेमात पडलेला असतो. तोही तिच्यावर बलात्कार करतो. ती त्याचा खून करते. त्यानंतर समोर येणा-या अनेकांना मारते. शेवटी पोलिस तिला मारतात. पण मेल्यानंतरही तिची विटंबना थांबत नाही. शवविच्छेदनासाठी जेव्हा तिचा मृतदेह नेण्यात येतो तेव्हा तिथला एक कर्मचारीही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो.
सौंदर्य हे निसर्गदत्त असते. त्यात त्या व्यक्तिचं कर्तृत्त्व नसतं. त्यामुळे त्याचा नको तितका अभिमान बाळगणं चुकच. पण या सौंदर्याचा दुसराही सोयिस्कर अर्थ अनेक पुरुष लावतात. तो म्हणजे हे सौंदर्य उपभोगायलाच हवं. किंवा अशा सौंदर्यवती या पुरुषांच्या प्रेमात पडायला तयारच बसलेल्या असतात. सुंदर मुलींवर भरवसा ठेवता येत नाही असाही अनेकांचा समज असतो. सुंदर स्त्री घरात असणं म्हणजे संकटाला निमंत्रण हाही अनेक कुटुंबाचा विश्वास असतो. या सर्व गोष्टी होत असताना त्या मुलीला काय वाटतं याचा विचार फार कमी लोक करतात. तीही इतर चार मुलींसारखीच आहे याचा विसर लोकांना पडतो. सौंदर्य हे फक्त कातडीपूरतं असतं असं म्हणतात. खरं सौंदर्य हे विचार व कृतींमध्ये असतं पण याकडे लोकांचं लक्ष जात नाही. या सौंदर्याच्या आडून स्वतःची वासना शमवणं यापलिकडे दुसरा कोणताही उद्देश नसतो.

पण हे असं का घडतं हा प्रश्न आहे. पुरुष असे का वागतात हा प्रश्न आहे. आशियाई देशांमध्ये स्त्रीयांना कायम दुय्यम स्थान देण्यात आलं आहे. तर पुरुषांनाही अकारण डोक्यावर चढवून ठेवण्यात येतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये असलेलं अवघडलेपण, मित्रतेचा अभाव, एकमेकांना समान न मानण्याची शिकवण या सर्वांची परिणती अशा गोष्टींमध्ये होत असते. एखाद्याच्या सौंदर्याची प्रशंसा करणं व ती ऐकणं या दोन्ही गोष्टींत अजूनही एक अवघडलेपण असतं. त्यातली सहजता हरवल्यामुळे या साध्या नैसर्गिक गोष्टींबाबत एक अकारण कुतुहूल निर्माण झालेलं असतं. शारिरिक सौंदर्यावर त्या माणसाची प्रतिष्ठा ठरवण्याचा आणखी एक चूकीचा पायंडा आपल्या समाजात आहे. परिणामी जी माणसं सुंदर असतात त्यांच्यात अनावश्यक अभिमान येतो आणि जी सुंदर नाहीत ती कायम न्यूनगंडात जगत राहतात. मूळात एक व्यक्ति सुंदर किंवा दुसरी व्यक्ति कुरुप आहे असं समजणं हेच चुकीचं आहे. प्रत्येकजण त्याच्या परीनं सुंदरच असतो. शरीरानं नाहीतर मनानं. विचारांनी किंवा कृतीनं. ते समजून घ्यायला हवं. आपली कुरुपताही यातच दडलेली असते. स्वतःविषयी हीन भावना असेल तरच इतरांचा आपल्याला हेवा वाटतो. आपल्यात काही उणीवा आहेत असा गैरसमज असल्यानेच इतरांविषयी आपल्याला तिरस्कार वाटतो. हा तिरस्कार मग अशा पद्धतीनं बाहेर पडत असतो. हे बदलायचं असेल तर आपल्या समाजाची ही चूकीची समजूत आधी बदलायला लागेल. समाज मग तो कोरियन असो वा भारतीय, त्याच्या या समजूती सारख्याच असतात. या चित्रपटांतून हेच शिकायचं आहे. 

No comments:

Post a Comment