तंत्रज्ञान माणसाला कसं क्षुद्र करून सोडतं याचा सून्न करणारा अनुभव
सध्या मी घेत आहे. माहिती तंत्रज्ञानानं जगाचं स्वरुप बदललं यात शंकाच नाही. पण
यात माणूसही अंतर्बाह्य बदलला आणि त्याच्या अस्तित्वाला जो काही अर्थ आणि महत्त्व
होतं त्याच्यातही बदल झाला आहे. हा बदल दूर्दैव्यानं चांगला कमी आणि वाईट जास्त
आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे अनेकांची आयुष्यं चांगल्या अर्थानं बदलली आहेत यात
शंकाच नाही. पण त्याचवेळी असं दिसून येतंय की माणसाच्या अस्तित्वाला या तंत्रज्ञानानं
पोखरून काढायला सुरूवात झाली आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे सध्याच्या या
तंत्रज्ञानाच्या जगात माणसाचं महत्त्व हे दिवसेंदिवस कमी होत चाललंय.
ज्या अवाढव्य कंपन्यांच्या मदतीनं हे आधुनिक तंत्रज्ञान सामान्य
माणसाच्या आवाक्यात येतंय त्यांचं योगदान नाकारून चालणार नाही. पण हे मान्य
केल्यानंतर मात्र त्यांतून माणसाला उपयोगी असं काय त्यांच्याकडून मिळतंय असा
प्रश्न विचारला तर मात्र त्याचं उत्तर नकारात्मक जास्त येतंय. या कंपन्यांच्या
नजरेत माणूस हा केवळ एक ग्राहक आहे आणि त्याला कसं निरनिराळ्या पद्धतीनं गंडवायचं
आणि त्याचवेळी त्याला आपल्या जाळ्यातून निसटू न देण्यासाठी काय काय युक्त्या
करायच्या या एकाच पद्धतीनं हा सारा व्यवहार सुरू असतो.
मी सध्या रिलायन्स ब्रॉडबॅन्डची सेवा घेतोय किंवा घेत होतो असं
म्हणायला हवा खरं तर. माझ्या कामाच्या संदर्भात मला अशी सेवा उपयोगी पडते.
सुरूवातीच्या काळात ही सेवा चांगली चालली पण नंतर अडचणी व अडथळे सुरू झाले जे
वाढतच गेलेत. महिन्यातील दहा ते पंधरा दिवस ही सेवा बंद असते आणि जेव्हा ती चालू
असते तेव्हाही ती फारतर अर्धा एक तास सुरू असते आणि पुन्हा बंद होते. पण यांना
महिन्याचं बिल भरावं लागतं आणि ते भरलं नाही तर रोज त्यासाठी तगादा सुरू होतो. एसेमेस,
इमेल्स आणि कॉल्स सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही बिल भरायलाच पाहिजे याचा हा दबाव
आणला जातो. एवढी तत्परता त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मात्र ते कधीही दाखवत
नाही.
आपण पाठवलेल्या इमेल्सला त्यांच्याकडून इतक्या प्रेमानं व सभ्यतेनं
उत्तर पाठवलं जातं की ते संगणकीय उत्तर असावं याची शंका येते. तक्रार केल्यानंतर तीनचार
दिवसानंतर त्यांचं उत्तर येतं की तुमची समस्या आम्ही सोडवलेली आहे. ही समस्या कधी
व कशी व कोणी सोडवलेली असते हे मला अजूनही कळलेलं नाही. अनेकदा सांगूनही त्यांनी
कधीच त्यांच्या कोणत्याही माणसाला माझ्याशी बोलायला पाठवलं नाही. यावेळेस मी
त्यांचं बिल भरलेलं नाही तर त्यांनी माझी इंटरनेट सेवा खंडीत केली आहे. पण बिल
भरण्याचा तगादा तसाच आहे. या प्रकरणाची ट्राईकडे तक्रार करावी म्हणून मी त्यांच्या
साईटवर गेलो तर अशा तक्रारींचा महापूरच आहे तिकडे. त्यामुळे मी ते टाळलं. मी आता
ग्राहक पंचायतीकडे जाण्याच्या विचारात आहे पण मी ते करेनच याची शाश्वती नाही.
आता हे सारं मी का सांगतोय तर त्याचं कारण आहे या कंपन्यांनी
तंत्रज्ञानाची स्वप्नं दाखवून आम्हाला कसं त्यांचं गुलाम करून टाकलंय यासाठी.
इंटरनेट असो किंवा मोबाईल रिचार्ज असो, दिवसरात्र त्यावर ऑफर्सचा मारा सुरू असतो.
या ऑफर्स इतक्या विचित्र आणि फसव्या आणि तोंडाला पाणी आणणा-या असतात की लोक सहज
त्याला बळी पडतात. पण खरा त्रास त्यानंतर सुरू होतो. या योजनांना इतक्या पूर्व अटी
आणि अटी असतात की त्यांतून ग्राहक नावाचा बोकड कधी कापला जातो ते त्याला कळतही
नाही. दररोज या फसव्या ऑफर्सचा रतीब घालून तो पोसला जातो आणि रोज कापलाही जातो. या
सर्व प्रकरणांत माणसाला माणूस म्हणून काडीचंही महत्त्वं उरलेलं नाही. त्याला
तंत्रज्ञानाचे फायदे दाखवून, आधी गळाला लावायचं, मग तो कायम त्या जाळ्यात कसा
राहिल याच्या योजना त्याच्यासमोर फेकायच्या.
या योजनांत दिली गेलेली आश्वासनं किती खरी आणि किती खोटी याची कोणतीही
माहिती ग्राहकाला नसते. जितका डाटा देण्याचं आश्वासन दिलं जातं त्यातील किती डाटा
खरंच मिळतो आणि किती खरंच वापरला जातो हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यांनी
सांगायचं आणि आपण ते खरं मानायचं यापलिकडे आपल्या काही हातांत नसतं. ग्राहकांना
आपली गरज आहे हे कंपन्यांना चांगलंच माहिती असतं आणि त्याचाच ते गैरफायदा घेतात.
इंटरनेट हे खरं तर माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या कामासाठी उपयुक्त
ठरतं. मनोरंजनासाठी त्याचा मी क्वचितच उपयोग करतो. त्यामुळे ही सेवा खंडीत
होण्याचा त्रास मला जास्त होतोय. कंपन्यांना ही गोष्ट माहित असल्यानं त्याचा ते
अचूक फायदा उठवतात. त्यामुळे या कंपन्याच्या विरोधातही जाता येत नाही. एकटा माणूस
इतक्या अवाढव्य कंपन्यांशी कसा लढा देऊ शकतो हा माझ्यापुढचा प्रश्न आहे.
आपण महासत्ता असल्याचा दावा सध्या काही उत्साही लोक सातत्यानं करत
असतात. महासत्ता असण्याचं लक्षण म्हणजे महासत्तेचे लाभ हे तळातल्या माणसांपर्यंत
पोहोचणं. त्याला परवडेल अशा पद्धतीनं पोहोचणं. या कसोटीवर माहिती तंत्रज्ञानाच्या
कंपन्या काही प्रमाणात ख-या उतरतात पण ब-याच प्रमाणात त्या केवळ ग्राहकांची लूटच
करताहेत हे अगदी उघडपणे जाणवतं. आणि आपल्याला काही करता येत नाही ही अगतिकता
जाणवून मन दुखावतं.
अशावेळी आधीची व्यवस्था चांगली होती असंही जाणवतं पण ते केवळ फसवं
समाधान आहे हेही समजतं. कारण काळ पुन्हा मागे परतवता येत नाही. आणि माझी इच्छा
असली तरीही जगाची काही तशी इच्छा नसते. शेवटी येऊन जाऊन मुद्दा तिथेच येतो जिथं
माणूस म्हणून या अवाढव्य यंत्रणांसमोर त्याला काहीच महत्त्व नाही. त्याची इच्छा
तोकडी पडते, त्याचा पैसा तोकडा पडतो, त्याचे प्रयत्न तोकडे पडतात. मुकाटपणे हे
सारं सोसत जायचं कारण गरज आपल्याला आहे. त्यांना नाहीच. यांतून काही एक गोष्टी
घडतील तेव्हा घडतील नाही असं नाही पण तोवर माझ्यासारख्या लाखोंना जो फटका बसलेला
असेल ते नुकसान कधीच भरून निघणार नाही. दुःख याचं नाही की पैसा वाया जातोय. दुःख
याचं आहे की माणूस म्हणून माझं अस्तित्त्व यापुढे दिवसेंदिवस कमीच होत जाणार आहे.
आणि प्रयत्न करूनही हा कोसळ थांबवता येणार नाही.

No comments:
Post a Comment